विस्कळीत वाहतुकीमुळे शहरवासी त्रस्त.
शहराला पर्यायी बायपास देण्याची मागणी.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक बघता बस स्थानक परिसरात अमरावती – यवतमाळ या रस्त्यावर ‘ट्राफिक जाम’ ही नित्याचीच बाब झालेली आहे. विस्कळीत वाहतुकीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
ही वाहतूक कोंडी कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित होत आहे. दररोज होत असलेली लोकसंख्या वाढ, त्यामुळे दुचाकी, चारचाकीची वाढत असलेली खरेदी त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मात्र वाढलेली आहे. शहरची परीस्थिती गुदमरल्यासारखी झाली आहे. ग्रामीण भागातून दररोज हजारावर विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता नांदगाव खंडेश्वर शहरात येतात. यातच ग्रामीण भागात शिकविणारे शिक्षक, कर्मचारी, अधिकारी हे फक्त कागदावरच कार्यालयीन मुक्कामी राहत असल्याचे दाखवितात प्रत्यक्षात मात्र ते ये- जा करतात
ते ही मोठ्या प्रमाणात वाहतुकीत भर टाकतात त्यामुळे त्यामुळे शहरात यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी नेहमीचीच झाली आहे.
शहराला बायपास व्हावा याकरिता गेल्या 5 ते 10 वर्षांपासून पोकळ चर्चा आहे. याकरिता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची खरी गरज असतानाही ते याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता शहरासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या बायपाससाठी नागरिकांनीच समोर येण्याची खरी गरज असल्याचे बोलल्या जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर ट्राफिक जाम लागणे नित्याचे झाले असले तरीही शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता वाहतूक पोलिसांनी कर्तव्यबजावणे गरजेचे आहे पण ते सुद्धा याठिकाणी नियमित पने दिसत नसल्याने या परिसरात अपघाताची शक्यता बळावली आहे. किमान शाळा,महाविद्यालय आणि शासकीय कार्यालय सुरू आणि बंद होण्याच्या वेळेवर तरी वाहतूक पोलिसांनी या परिसरात उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावले पाहिजे अन्यथा या परिसरात वाहतूक कोंडीमुळे कधीही अपघात होऊ शकतो हे मात्र निश्चित.
तर टाळले जाऊ शकतात अपघात.
नांदगाव खंडेश्वर शहराला बायपास हा अत्यंत आवश्यक पर्याय असल्याची शहरवासीयांची मागणी असून कित्येक वर्षांपासूनची असताना याकरिता या विभागाच्या आमदार, खासदार यांनी पुढाकार घेऊन त्या संबंधीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली असून लोक प्रतिनिधी पुढाकार घेतात किंवा नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे येथे किरकोळ अपघातसुद्धा नेहमीच होत असतात. हे सर्व प्रकार होत असताना शहरातून होणारी जड़ वाहतूक वायपासमार्गे होऊ शकते. त्यामुळे शहरातील 50 टक्के अपघाताचा धोका टळणार, हे मात्र निश्चित.!