“श्रद्धेय एकनाथजी रानडे यांच्या विचारातील राष्ट्रवाद इथल्या प्रत्येक युवकांच्या काळजात पेरणे आवश्यक आहे.”- प्रा.विशाल मेश्राम.
टिमटाळा येथे एकनाथजी रानडे यांची जयंती साजरी
टिमटाळा/श्रीपाल सहारे
“श्रद्धेय एकनाथजी रानडे यांच्या विचारांतील राष्ट्रवाद हा जपायचं असेल तर या देशातील तरुणाईला जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे,सोशल मिडियाच्या जाळ्यात अडकणाऱ्या या तरुणाईला वेळीच आवर घालायचा असेल तर सुरज सहारे लिखित मिशन जन्मभूमी हे पुस्तक वाचणे अत्यंत आवश्यक राहील,या राष्ट्राला प्रगती पथावर न्यायचे असेल तर इथल्या युवकांमध्ये देशप्रेमाची भावना,प्रखर राष्ट्रवाद आणि सामाजिक जाणिव आणि जागृती निर्माण करता यायला हवी” असे प्रतिपादन खिरसानाचे सरपंच प्रा.विशाल मेश्राम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. श्रध्देय एकनाथजी रानडे यांच्या जन्मभूमिवर आधारित सुरज सहारे लिखित “मिशन जन्मभूमि” पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
सविस्तर वृत्त असे की, जगप्रसिद्ध कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार श्रध्देय एकनाथजी रानडे यांची १०९ वी जयंती, आणि संविधान दिवस व विद्यार्थीरत्न सुरज श्रीपाल सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित श्रध्देय एकनाथजी रानडे यांच्या जन्मभूमिवर आधारित सुरज श्रीपाल सहारे लिखीत “मिशन जन्मभूमि” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा येथील युटिलीटी सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिमटाळाचे सरपंच प्रा.विशाल मेश्राम हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरचे विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव यांचेसोबतच प्रमुख अतिथी म्हणून पॉवर ऑफ मिडीयाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे, विदर्भ सदस्य अमोल नानोटकर, खिरसाना ग्रामपंचायतिच्या सचिव शारदा चौधरी,भाजपाचे नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, जि.प. शाळेचे शिक्षक गजानन देशमुख,मानस पब्लिकेशन अमरावतीचे संचालक विकास राऊत, पॉवर ऑफ मिडीयाचे तालुकाध्यक्ष श्रीपाल सहारे, मिशन जन्मभूमि पुस्तकाचे लेखक सुरज सहारे व्यासपीठावर विराजमान होते. देविदास गाडेकर, गणेश माटोडे, प्रशांत झोपाटे, नितेश कानबाले, अनिकेत शिरभाते, सागर गावनेर.अंकुश निमनेकर,रमेश गंजीवाले, योगश राऊत, प्रमोद कोटांगले, अनिल बारसे याप्रमाणेच परिसरातील ग्रामस्थ व बहुसंख्येने पाहुणेमंडळी उपस्थित होते.
श्रध्देय एकनाथजी रानडे यांची जयंती साजरी
कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील विराजमान मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, टिमटाळा गावचे सुपुत्र कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार श्रध्देय एकनाथजी रानडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले. व याच कार्यक्रमात श्रध्देय एकनाथजी रानडे यांची १०९ वी जयंती साजरी करण्यात आली व दरवर्षीच एकनाथजींची जयंती पॉवर ऑफ मिडीया साजरी करणार असून शासनस्तरावर सुद्धा एकनाथजींची जयंती साजरी करण्यात यावी अशी मागणीही पॉवर ऑफ मिडीयाच्या वतीने करण्यात आली.
टिमटाळा धरणाला “एकनाथजी रानडे” यांचे नाव.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग,विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर क्षेत्राच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत टिमटाळा लघुपाटबंधारे विभागाला “एकनाथजी रानडे ” यांचे नाव देण्याची मागणीही पॉवर ऑफ मिडीयाच्या वतीने करण्यात आली आहे असता ती मागणी सरपंच प्रा.विशाल मेश्राम यांनी लगेच मंजूर केली आणि याबाबत ग्रामपंचायतीचा ठराव झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.