बदलत्या वातावरणामुळे पिकावर मोजाक अळीचा प्रादुर्भाव.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
दिनांक 6 रोजी नांदगाव खंडेश्वर मधील धानोरा फरशी,जयसिंग गावातील शेतशिवरात मा. उपविभागीय कृषी अधिकारी अमरावती डॉ पंकज चेडे, कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथील कीड रोग विषय विशेषज्ञ श्री संजय पाचकवडे यांच्यामार्फत हरभरा, गहू, तूर व कपाशी पिकाची पाहणी करण्यात आली. सदर क्षेत्रामध्ये तंबाखू वरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सर्वच पिकांवर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. वरील पीक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे नियंत्रणात्मक उपाययोजना करणे बाबत कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले.
तंबाखू वरील पाने खाणाऱ्या या बहुजातीय पिकाचे नुकसान करणाऱ्या किडीला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले. ही अळी मळकट हिरव्या रंगाची असून तिच्या शरीरावर पिवळसर नारंगी रेषा आणि काळे ठिपके असतात. पूर्ण वाढलेली अळी ही 30 ते 40 मी मी लांब असते, आधी पतंग हे पुंजक्याने पानावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकपणे पानाचा हिरवा पदार्थ खातात जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाला पाने राहत नाही. कीड ही प्राथमिक अवस्थेत असल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 3 ते 4अळ्या प्रती चौरस मीटर आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी गाठल्याच्या समजते.
अशा परिस्थितीत जैविक कीडनाशक जसे मेटारायझियम यांनीसोपली व बिवेरिया बेसियांना या एंटोमोपाथोजेनिक बुरशीची प्रत्यक्ती 50 मी ली. प्रति 10 ली पाण्यात मिसळून फवारणी केल्यास अळी तसेच जमिनीतील कोशांचा नाश होतो.
व अळीचे नियंत्रण मिळवता येते. वरील जैविक कीडनाशकाची फवारणी घ्यावयाचे असल्यास फवारणी पूर्वी स्प्रे पंप हा स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे आवश्यक आहे. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची असल्यास इंडोक्साकार्ब 15.8 एससी 6.6 मी ली किंवा फ्लूबेंडामाइड 20 डबलू जी 5 ते 6 ग्रा. किंवा नोव्हालूरोन 6.25% अधिक इंडोक्साकार्ब 4.5% एस सी 17.50 मी ली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री रोशन इंदोरे, मंडळ कृषी अधिकारी श्री अनिल वानखडे, कृषी सहायक श्री सचिन आंधळे व शेतकरी उपस्थित होते.