अनेकांना साथीच्या आजारांची लागण.
पावसाच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मागील आठवड्यात सतत ५-६ दिवस अवकाळी पाऊस झाल्याने थंडीचा जोर वाढला असून, पहाटे दाट दवयुक्त धुक्याची चादर तर दिवसभर कोंडलेले ढगाळ हवामान अशा कोंदटलेल्या वातावरणामुळे शेती आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. जवळपास गावागावांत निम्म्याहून अधिक नागरिकांना सर्दी, खोकला व ताप अशा व्हायरल आजारांची लागण झाली आहे. तर हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरी हवालदिल झाले असून शेतकरी हा पावसाच्या शक्यतेने धास्तावला आहे.
यंदा दरवर्षीप्रमाणे म्हणावा तितका
पाऊस झालेला नाही. जे तालुके अतिपर्जन्यवृष्टीचे म्हणून गणले जातात, त्याच तालुक्यांना कमी पावसाचा फटका बसला आहे. यामुळे पिकांची अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नाही यामुळे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सोसावा लागणारआहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. तर कापूस व इतर पिकांचीही परिस्थिती काही वेगळी नाही. त्यातच परतीच्या पावसाने अनेकांच्या सुगीवर पाणी फेरल्याने तूर, हरभरा व भाजीपाला काळा पडला आहे.
या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मानवासह जनावरांच्या आरोग्यासंबंधी तक्रारी वाढल्याने त्याचा दूध उत्पादन फॅटवर परिणाम झाला आहे. या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे गणितच कोलमडले आहे. एकंदरीत दवाखान्यांत रुग्ण वाढले! ढगाळ वातावरणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांचेच आरोग्य बिघडले आहे. सर्दी, पडसे, ताप, खोकला, अशक्तपणा, डोकेदुखी, शारीरिक अकार्यक्षमता अशा व्हायरल आजारांमुळे गावागावांत निम्म्याहून अधिक नागरिक रुग्ण बनले आहेत. खासगीसह सरकारी दवाखान्यात वर्दळ वाढली आहे. शेतकरी आतबट्ट्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहे.