१६८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर असूनही कामात दिरंगाई
जनप्रतिनिधी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
श्रीपाल सहारे यांचा तीन दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा आमरण उपोषण.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी.
टिमटाळा-अंजनगाव बारी रस्ता डांबरीकरण व पुलबांधणी करीता १६८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर होऊनही कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे मात्र याबाबत माहिती असूनही जनप्रतिनिधी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे
.
सविस्तर वृत्त असे की, बहुचर्चित टिमटाळा(ता. नांदगाव खंडेश्वर) ते अंजनगाव बारी (ता. अमरावती) या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यापैकी एक किलोमीटर रस्ता बडनेरा विधानसभेच्या हद्दीत व उर्वरित एक किलोमीटर रस्ता धामणगाव विधानसभेच्या हद्दीत येत असून यावरील डांबरीकरण व पुलबांधणी करीता १६८ लक्ष रूपयांचा निधी जूलैमहिन्यातच शासनाकडून मंजूर करण्यात आला. मात्र पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही या रस्त्यावर एक ट्रक मुरूम किंवा गिट्टी चा आणलेला नाही. सदर रस्त्याचे भान जनप्रतिनिधी व प्रशासनाला असूनही कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे टिमटाळा ते अंजनगाव बारी रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
दोन दिवसांपूर्वीच ड्युटीवरून घरी परतत असतांना टिमटाळा येथील रेल्वे कर्मचारी सुरज सहारे यांची दुचाकी घसरून अपघात घडला यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्यांच्या हाताला व पाठीला आतून इजा झाली होती. त्यांच्यावर तातडीने टिमटाळा येथील संवेदना रूग्णालयाच्या डॉक्टरांनी उपचार केले. मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने त्यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
या रस्त्यावर या आधीही अशाप्रकारचे अपघात झाले आहेत मात्र तक्रारी, निवेदने व संबंधित प्रशासनाला याच्या सुचना देऊनही यावर ते कानाडोळा करीत आहे. शासनाद्वारे १६८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर होऊनही कामास दिरंगाई करणा-या कंत्राटदार व संबंधित प्रशासनाला काम सुरू करण्यास पॉवर ऑफ मिडीया नांदगाव खंडेश्वर चे तालुकाध्यक्ष श्रीपाल सहारे यांनी तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून कामाला सुरुवात न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा ही वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रशासनाला दिला आहे.