# भाव वाढण्याच्या अपेक्षेने साठऊन ठेवले परंतु भाव झाले आणखी कमी.
# शेतकऱ्यांची चिंता वाढली.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
खाद्य तेलाच्या उत्तरत असलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनचे भाव ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले आहेत. या दरात उत्पादन खर्चदेखील भागत नसल्याने, दरातील घसरण शेतकऱ्यांसाठी फारच अडचणीची ठरत आहे.
गेल्या काही वर्षांत नगदी पीक म्हणून जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. यंदा पूर्ण पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने व ऐन पीक तयार होण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर परिणाम झाला. एकरी उत्पादन दोन ते तीन क्विटलने कमी झाले आहे. सोयाबीन काढणी,पेरणी ते मळणीपर्यंतचा उत्पादन खर्च व सध्या मिळत असलेला दर पाहता उत्पादन खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही.
येत्या काळात निवडणुका होणार असल्याने खाद्यतेलाचे भाव वाढणार नाहीत, या शक्यतेने सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला काही काळ ५ हजार रुपये प्रतिक्विटल असलेला दर पुन्हा ४ हजार ते ४ हजार ५०० असा राहिला.डिसेंबर महिन्याच्या मध्यावर काही दिवस सोयाबीन दरात तेजी येऊन दर ५ हजार ते ५ हजार २०० झाला ही तेजी कायम राहून दर ६ हजार ते ६ हजार ५०० पर्यंत जाण्याच्या स्थितीने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री थांबवली. बऱ्याच शेतकऱ्यांकडे गत विक्री हंगामातील सोयाबीन शिल्लक आहे. तथापि, मोठ्या प्रमाणात बाजारातील तेलाच्या दरात घसरण झाली व त्याचाच परिणाम म्हणून खाद्यतेलासाठीचा कच्चामाल असलेल्या सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण होऊन दर पुन्हा खाली आले.
भविष्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही दर वाढण्याची शक्यता दिसत नसल्याने अजून किती काळ सोयाबीन घरी ठेवायचे व सोयाबीन विक्रीचे येणाऱ्या पैशांच्या आधारावर रब्बी हंगामासाठी घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची याची चिंता सरकार व इतर पिकांच्या दरासाठी आक्रमक होणारे शेतकरी नेते यांनी सोयाबीन दरवाढ करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सोयाबीन व इतर शेतमालाच्या भावाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने शेती व शेतकरी तोट्यात जात आहे. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप
अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
— आजच्या तारखे मध्ये सोयाबीनचे भाव चार हजार पाचशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपये आहे.सोयाबीन निघाले होते तेव्हा पाच हजाराचे भाव होते आणि आता सोयाबीन सुकलेलं असून सुद्धा 4500 भाव सोयाबीनचे शेतकऱ्यांना मिळत आहे भाव वाढण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठऊन ठेवले होते पण सोयाबीनचे भाव वाढण्या ऐवजी कमी होत आहे.त्याचप्रमाणे दिवसेंदिवस कापसाचे सुद्धा भाव कमी होत चालले आहेत सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये कापसाला भाव आहे.त्यामुळे शेतकरी चागलाच अडचणीत सापडला आहे शेत माल घरात साठऊन आहे विकावं की नाही समजत नाही हे समजायला मार्गच नाही.
— अनिकेत शिरभाते
शेतकरी,मंगरुळ चव्हाळा.